“समुपदेशन “ही एक मानसशास्त्रीय उपचार पद्धती आहे हे आपण पाहिले.पण यातील मानसशास्त्रीय आणि उपचार पद्धती या शब्दांनी आतापर्यंत याविषयी फारच गैरसमज पसरवले असण्याची शक्यता आहे. उपचार म्हटले की ते आजारी माणसासाठीच असावेत असं वाटू शकतं. आणि त्यातही ते मानसशास्त्रीय असतील तर अजूनच मोठा गोंधळ. म्हणजे मानसिक दृष्ट्या जे आजारी आहेत, (आपल्या सर्वांचा आवडता  शब्द – वेडा किंवा वेडी) त्यांच्याच साठीची ही भानगड असावी असं वाटू शकतं. पण हे खरं नाही. प्रत्यक्षात, व्यक्तिमत्व विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रशिक्षण तंत्रामध्ये बराचसा भर हा समुपदेशन तंत्रावरच असतो. समुपदेशकाबरोबर केलेली पाऊण तासाची चर्चा, म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची एक छोटीशी कार्यशाळाच असते. मनोविकारांवरील उपचार हे समुपदेशनाचा वापर होणाऱ्या अनेक क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे एवढेच. याविषयी आपण पुढे विस्तृत चर्चा करूच. पण तूर्त आपण समुपदेशन ही नेमकी काय भानगड आहे हे समजून घेऊ.

     समुपदेशनाला ‘टॉकथेरपी’ असंही म्हटलं जातं. संवादाच्या माध्यमातून समस्येची सोडवणूक असे समुपदेशनाचे स्वरूप असते. या स्वरूपाच्या आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टी, म्हणजे सल्ला आणि उपदेश. कधीतरी आपल्याला एखादा निर्णय घ्यायला अडचण येते. मग आपण अशा एखाद्या माणसाकडे जातो, की ज्याला त्या विषयातील आपल्यापेक्षा अधिक ज्ञान आहे, असं आपल्याला वाटतं. मग त्याच्याशी चर्चा केल्यावर आपल्याला, कदाचित त्यासंबंधी निर्णय घेणं सोपं होतं. आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या आयुष्यभराच्या अनुभवाचा फायदा, सल्ला, उपदेशाच्या रूपाने आपल्याला मिळतच असतो. अनेकदा असा सल्ला देण्याचं काम आपले मित्रही करत असतात. किंवा व्यवसाय, धंद्याच्या क्षेत्रात व्यावसायिक तज्ञ सुद्धा असा सल्ला देत असतात. उदा. कर सल्लागार, किंवा गुंतवणूक सल्लागार.

     हे जे सल्लागार असतात, ते त्या त्या विषयातील तज्ञ असतात. आपापल्या क्षेत्रात, अभ्यासाने त्यांनी तज्ञता मिळवलेली असते. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे स्वरूप नेमके कसे असते.? तर आपल्या समस्येवर सुचवलेले एक तयार उत्तर असे ते असते. म्हणजे कसे.? उदा. आपल्याला आपल्या बचतीच्या पैशांची गुंतवणूक करायची आहे. म्हणून आपण गुंतवणूक सल्लागाराकडे जातो. मग तो आपल्याला माहिती विचारतो. एकदा त्याला हवी असलेली माहिती त्याला दिली, की तो बाजारात उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी, आपल्या गरजेप्रमाणे त्याला योग्य वाटणारा पर्याय सुचवतो. म्हणजे काय, तर आपल्या समस्येवरील अगदी तयार, रेडीमेड उत्तर तो देतो.

     आता थोडंसं उपदेशाबद्दल. उपदेश हा शब्द बराचसा अध्यात्मिक परंपरेतून आलेला आहे. त्याच्या अर्थामध्ये काहीशी आदेशात्मकतेची छटा आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती त्यांच्या शिष्यवर्गाला उपदेश देतात. उपदेश देणाऱ्याच्या अध्यात्मिक थोरवीची, आणि अधिकाराची प्रभावळ या उपदेशा भोवती असते. आणि त्या उपदेशाप्रमाणे न वागण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

     या तुलनेत समुपदेशन ही एक वेगळीच संकल्पना आहे. समुपदेशनात कधीच थेट सल्ला किंवा आदेश दिला जात नाही. मग समुपदेशन नेमकं कसं असतं.? आपण पाहूया.. एखादा माणूस, एखाद्या प्रसंगात, एका विशिष्ट प्रकारे वागतो. त्याची वागण्याची पद्धत ही खास त्याची अशी ‘व्यक्तीविशिष्ट’ असते. ही पद्धत कशी ठरते? तर त्या प्रसंगाचं, त्या माणसाला, जसं आकलन होतं, त्यावर ही पद्धत ठरते. त्या माणसाला, त्या प्रसंगाचं होणारं आकलन, हे त्याच्या मानसिक सवयींवर अवलंबून असतं. मानसिक सवयी या पूर्वानुभवावर आधारित असतात. सोप्या भाषेत बोलायचं झालं, तर त्या प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा असेल, तसं त्याचं आकलन असतं. हा दृष्टिकोनसुद्धा आपल्या मानसिक सवयींचं फलित असू शकत. दृष्टिकोन हा शब्द, अर्थाच्या दृष्टीने अगदीच ढोबळ आहे. मानसशास्त्रात या अर्थाने अभिवृत्ती हा शब्द वापरला जातो. थोडक्यात काय, तर माणसाच्या वागण्याच्या मुळाशी, त्याचा त्या प्रसंगाबद्दलचा दृष्टिकोन असतो. सहाजिकच, जेव्हा दृष्टिकोन सदोष असतो, तेव्हा आकलन सुद्धा सदोषच असणार. सदोष आकलनापोटी होणारं वर्तन सुद्धा, काहीसं विचलित असणार यात काय शंका.? या सगळ्याचा अर्थ असा निघतो की, जर वर्तनातील दोष दूर करायचे असतील, तर त्याच्या मुळाशी असणाऱ्या सदोष दृष्टीकोनांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आणि समुपदेशकाची भूमिका नेमकी इथेच सुरू होते.

     सदोष वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या सदोष दृष्टिकोनातील दोष, दूर करून, ते सामान्य पातळीवर आणणे हेच तर समुपदेशकाचे काम असते. त्यासाठी समुपदेशक जी “संवाद तंत्रे” (communication techniques)वापरतो, ती फार महत्त्वाची असतात. समूपदेशकाकडे आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, तो कधीही, “तुमचं हे असं चुकतं आहे. त्यात अशी अशी सुधारणा करा” असा थेट सल्ला देत नाही. कारण ते काहीच उपयोगाचं नसतं. उच्च रक्तदाबाच्या पेशंटला डॉक्टर नेहमी सांगतात की, “आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. कशाचा जास्त विचार करू नका.”

     त्याला घरातील मंडळी सुद्धा सांगतात  की “फार मनाला लावून घेऊ नये, सोडून द्याव्यात लहान लहान गोष्टी.” पण त्याची अडचणी अशीअसते की, त्याला बिचाऱ्याला ‘हे करायचं कसं?’ हे माहीतच नसतं. कधी ना कधी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असतोच. हे घडण्यासाठी, त्या विशिष्ट दृष्टिकोनामधील दोषाबद्दल, त्या व्यक्तीच्या मनात एक जाणीव निर्माण व्हावी लागते. तशी जाणीव निर्माण झाल्यावर, वर्तमानातील बदलासाठी, वेगळे प्रयत्न करावेच लागत नाहीत. ते आपोआपच होतात. ही आवश्यक असलेली जाणीव निर्माण करण्याचं काम समुपदेशकाचं असतं.

     माणसाच्या शारीरिक वाढीनुसार, त्याच्या मानसिक विकासाच्या प्रक्रियेतील टप्पे, त्यातील धोक्याची वळणे, आणि त्यातील खाचाखळगे, हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. आणि, व्यक्तीशी संवाद साधून, त्याच्या समस्या नेमकेपणाने समजून घेऊन, त्याच्यामध्ये स्वतःविषयी आणि स्वतःच्या जगण्याविषयी, एक प्रगल्भ जाणीव निर्माण करणे, हा संज्ञापनशास्त्राच्या (communication science)अभ्यासाचा प्रांत आहे.

     समुपदेशकाला या दोन्ही गोष्टींची उत्तम जाण असावी लागते, सूक्ष्म अशा संज्ञापन तंत्रांचा, म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं तर, संवादतंत्रांचा वापर करून, प्रशिक्षित समुपदेशक, आपले उद्दिष्ट साध्य करीत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *