मना तळमळसी..लेखांक 3
साधारण पस्तीशीचा असलेला सुधीर, आपल्या वडिलांना म्हणजेच नानांना घेऊन समुपदेशकाकडे आला होता. नाना वय वर्षे 60 – 61 च्या आसपास. दोघांच्याही चेहऱ्यावर एक प्रचंड प्रश्नचिन्ह. प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली. तीन एक महिन्यापूर्वी नाना घरात चक्कर येऊन पडले. धावा धाव झाली. ताबडतोब जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उच्च रक्तदाबाचे निदान झाले. दोन-तीन दिवसात, औषधांच्या प्रभावाने, बीपी नॉर्मल झाला. मग नानांना घरी सोडले. फॅमिली डॉक्टरांच्या देखरेखीखाली, उपचार सुरूच राहिले. औषधे घेऊन सुद्धा नानांचा बीपी काही स्थिर राहिना. तो आपला अधून मधून उडी मारतच होता. असं का होतंय, हे विचारायला म्हणून सुधीर डॉक्टरांना भेटला. तेव्हा फॅमिली डॉक्टरांनी, त्याला, नानांना घेऊन कौन्सिलरकडे, म्हणजेच समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे नानांचे मन वळवून तो नानांना घेऊन आला होता.
मग समुपदेशकाने सुधीरला कुटुंबाविषयी, आणि नानांच्या स्वभावाविषयी सामान्य माहिती विचारली. सरकारी नोकरीतून, उच्च पदावरून, नाना दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. नाना, त्यांची पत्नी, मुलगा, सून, आणि दोन नातवंडे, असे सुखी कुटुंब. मुलगा इंजिनीयर होऊन बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकाराच्या जागेवर नोकरीला होता. सून सुद्धा खाजगी नोकरी करत होती. त्यामुळे दोघेही दिवसभर घराबाहेर असत. नानांची पत्नी, घर सांभाळणे आणि नातवंडे सांभाळण्यात दिवसभर मग्न असे. जोडीला भजनीमंडळ, भिशीमंडळ, छोट्या छोट्या सहली, वगैरे होत्याच. नानांचा स्वभाव तसा कामसू आणि मनमिळावू होता. पण अलीकडे, निवृत्तीनंतर, स्वभाव बदलला होता. नाना काहीसे तक्रारखोर आणि चिडचिडे झाले होते. घरातल्यांना हा बदल जाणवला होता. पण त्याचे कारण उलगडत नव्हते. सुधीर, ही सर्व माहिती सांगत असतानासुद्धा, नानांचे त्याच्यावर एक-दोनदा माफक असे खेकसणे झाले.
एवढी माहिती मिळाल्यानंतर, समुपदेशकाने काही अंदाज बांधले. आणि नानांशी एकट्याने बोलायचे आहे, म्हणून सुधीरला बाहेर बसायला सांगितले. सुधीर बाहेर गेला. मग समुपदेशकाने, आपली खास तंत्रे वापरून, नानांना बोलते केले. त्यांचे नोकरीतले दिवस, त्यांचे खास कर्तृत्व, वगैरे गोष्टीवरून, हळूच त्याने नानांना, आजच्या विषयाकडे वळवले. बायको, मुलगा, सून यांच्याविषयी बोलताना, नानांचा स्वर काहीसा कडवट झाला. त्यांनी अचानक जणू बॉम्बच टाकला. ते म्हणाले – – खरं सांगू का.. आता जगण्यात काही राम राहिला नाही असं वाटतं”
समुपदेशक – “असं का म्हणता नाना? अजून काही वय एवढं झालं नाही तुमचं. आताच ही निरवानिरवीची भाषा का?”
नाना – “अहो मग काय करू? जर, मी नकोसा झालो आहे सगळ्यांना, तर मग मी जगून काय करू?”
समुपदेशक – “आपण सर्वांना नकोसे झालो आहोत असं का वाटतंय तुम्हाला?
नाना – “कोणालाही माझ्यासाठी वेळ नसतो. मुलगा, सून जे सकाळी जातात, ते थेट संध्याकाळी उशिरा येतात. जेवणाच्या वेळी काही बोलणं झालं, तर झालं, नाहीतर तेही नाही. नातवंड शाळेत आणि अभ्यासात गर्क असतात. आणि बायकोची तर वेगळीच त-हा. तिला घरकामातून, आणि भजनीमंडळातून माझ्यासाठी वेळच नाही. मी घरात आहे, याची, नोंद सुद्धा घेत नाहीत हे लोक. मग मी काय करू?”
अशा तऱ्हेने नानांचे खरे दुखणे उघड झाले. पण वस्तुस्थिती अशी होती का? मुलगा आणि सून, नोकरीतील व्यस्ततेमुळे, दिवसभर घराबाहेर असत ही गोष्ट खरी होती. त्यांना खरेच वेळ नव्हता. पण ते नानांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होते, हे मात्र खरे नव्हते. मुलाला नोकरी लागून दहा-बारा वर्षे झाली होती. सूनही लग्नाआधी पासूनच नोकरी करत होती. पण अगोदर नाना स्वतःच नोकरीसाठी दिवसभर बाहेर असल्याने, त्यांना हे कधी जाणवलेच नव्हते. बायकोनेही तेव्हापासूनच तिच्या रिकाम्या वेळाची, भजनीमंडळ, घरकाम, वगैरे पद्धतीने, योग्य ती व्यवस्था लावली होती. नाना जेव्हा निवृत्त झाले, तेव्हा त्यांना संपूर्ण दिवस मोकळा मिळू लागला. पण बाकीच्यांचा दिनक्रम पूर्वीपासूनच ठरलेला होता. त्यात नानांसाठी वेगळा वेळ कुणीच ठेवला नव्हता. आपल्या रिकाम्या वेळात, काय करता येईल, याचा विचार नानांनी केलाच नव्हता. त्यामुळे ते रिकामपण त्यांना खायला उठत होते.
ज्याअर्थी घरातील लोक आपल्याला वेळ देत नाहीत, आपली नोंद घेत नाहीत, त्याअर्थी आपली त्यांना गरज नाही, आपण त्यांना नकोसे झालो आहोत, असा सोयीस्कर अर्थ नानांच्या मनाने लावला. ही नाकारलेपणाची भावना त्यांच्या मनात घर करून बसली. अशी भावना भयंकर असते. आपल्या माणसांमध्ये आपल्याला स्वीकारले जावे, त्यांच्या आयुष्यात आपल्याला स्थान असावे, ही माणसाची मनाची मूलभूत गरज असते. ती पूर्ण न झाल्यास, मनात नाकारलेपणाची तीव्र नकारात्मक भावना निर्माण होते. हळूहळू दृढीकरण होत, या भावनेचा जेव्हा उद्रेक होतो, तेव्हा त्याची लक्षणे, उच्च रक्तदाबा सारख्या मनोकायिक आजारांच्या रूपाने व्यक्त होऊ लागतात.
आता या समस्येच्या सोडवणुकीत, समुपदेशनाची भूमिका नेमकी काय? समुपदेशकाने केलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याने नानांना बोलते केले. त्यांच्या मनातील तीव्र नकारात्मक भावनेची त्सुनामी, जी दबली गेल्यामुळे, आतल्या आत धुमसुन, रक्तदाब वाढवत होती. ती बोलून, व्यक्त झाल्यामुळे, शांत झाली. मनातील नकारात्मक भावनांचा निचरा झाल्यामुळे, नानांची समस्या तिथेच निम्मी संपली. निवृत्तीनंतर, खरी समस्या होती ती नानांचा एकटेपण. नानांचं मन एकदा मोकळं झाल्यानंतर, समस्येबाबत राहिलेल्या गोष्टी तीन.
१) घरातील लोकांच्या वागण्याचा, आपण लावलेला अर्थ वस्तुस्थितीला धरून नाही, याविषयी नानांच्या मनात जाणीव निर्माण करणे.
२) मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून, स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी नानांना उद्युक्त करणे.
३) नातेसंबंध घट्ट टिकवण्यासाठी, आणि त्यात ओलावा टिकून राहावा, म्हणून, घरातील माणसांनी एकमेकांना काही वेळ देणे आवश्यक आहे, यासंबंधी संपूर्ण कुटुंबाच्या मनात एक जाणीव निर्माण करणे.
पहिली दोन कामे, ही नानांच्या संदर्भात असल्याने, त्यांच्याशी बोलून ती पूर्ण करता आली. मात्र तिसऱ्या कामासाठी संपूर्ण कुटुंबाशी बोलणे आवश्यक होते. त्यासाठी समुपदेशकाने, कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून, सुधीरशी चर्चा केली. खरी परिस्थिती कळल्यानंतर सुधीर आश्चर्यचकितच झाला. छोट्या छोट्या गोष्टींचे, इतके गंभीर परिणाम होऊ शकतात, हे जाणल्यानंतर, सुधीरमध्येसुद्धा, नात्यासंबंधी एक प्रगल्भ जाणीव निर्माण झाली. आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या जगण्यात, आवश्यक ते बदल करण्यास, सुधीर मनापासून आणि जबाबदारीने तयार झाला. समुपदेशकाकडे येताना, शंका आणि काळजीने घेरलेले नाना, आणि सुधीर, समुपदेशनाच्या दोन सत्रांनंतर, जाताना, काळजीमुक्त आणि आनंदी होऊन गेले.
( लेखांमध्ये उल्लेख केलेला प्रसंग, खरा असून, पात्रांची नावे मात्र बदललेली आहेत.)