मना तळमळसी… 3
मना तळमळसी..लेखांक 3 साधारण पस्तीशीचा असलेला सुधीर, आपल्या वडिलांना म्हणजेच नानांना घेऊन समुपदेशकाकडे आला होता. नाना वय वर्षे 60 – 61 च्या आसपास. दोघांच्याही चेहऱ्यावर एक प्रचंड प्रश्नचिन्ह. प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली. तीन एक महिन्यापूर्वी नाना घरात चक्कर येऊन पडले. धावा धाव झाली. ताबडतोब जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उच्च रक्तदाबाचे निदान झाले. दोन-तीन दिवसात, औषधांच्या प्रभावाने, बीपी नॉर्मल झाला. मग नानांना घरी सोडले. फॅमिली डॉक्टरांच्या देखरेखीखाली, उपचार सुरूच राहिले. औषधे घेऊन सुद्धा नानांचा बीपी काही स्थिर राहिना. तो आपला अधून मधून उडी मारतच होता. असं का होतंय, हे विचारायला म्हणून सुधीर डॉक्टरांना भेटला. तेव्हा फॅमिली डॉक्टरांनी, त्याला, नानांना घेऊन कौन्सिलरकडे, म्हणजेच समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे नानांचे मन वळवून तो नानांना घेऊन आला होता. मग समुपदेशकाने सुधीरला कुटुंबाविषयी, आणि नानांच्या स्वभावाविषयी सामान्य माहिती विचारली. सरकारी नोकरीतून, उच्च पदावरून, नाना दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. नाना, त्यांची पत्नी, मुलगा, सून, आणि दोन नातवंडे, असे सुखी कुटुंब. मुलगा इंजिनीयर होऊन बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकाराच्या जागेवर नोकरीला होता. सून सुद्धा खाजगी नोकरी करत होती. त्यामुळे दोघेही दिवसभर घराबाहेर असत. नानांची पत्नी, घर सांभाळणे आणि नातवंडे सांभाळण्यात दिवसभर मग्न असे. जोडीला भजनीमंडळ, भिशीमंडळ, छोट्या छोट्या सहली, वगैरे होत्याच. नानांचा स्वभाव तसा कामसू आणि मनमिळावू होता. पण अलीकडे, निवृत्तीनंतर, स्वभाव बदलला होता. नाना काहीसे तक्रारखोर आणि चिडचिडे झाले होते. घरातल्यांना हा बदल जाणवला होता. पण त्याचे कारण उलगडत नव्हते. सुधीर, ही सर्व माहिती सांगत असतानासुद्धा, नानांचे त्याच्यावर एक-दोनदा माफक असे खेकसणे झाले. एवढी माहिती मिळाल्यानंतर, समुपदेशकाने काही अंदाज बांधले. आणि नानांशी एकट्याने बोलायचे आहे, म्हणून सुधीरला बाहेर बसायला सांगितले. सुधीर बाहेर गेला. मग समुपदेशकाने, आपली खास तंत्रे वापरून, नानांना बोलते केले. त्यांचे नोकरीतले दिवस, त्यांचे खास कर्तृत्व, वगैरे गोष्टीवरून, हळूच त्याने नानांना, आजच्या विषयाकडे वळवले. बायको, मुलगा, सून यांच्याविषयी बोलताना, नानांचा स्वर काहीसा कडवट झाला. त्यांनी अचानक जणू बॉम्बच टाकला. ते म्हणाले – – खरं सांगू का.. आता जगण्यात काही राम राहिला नाही असं वाटतं” समुपदेशक – “असं का म्हणता नाना? अजून काही वय एवढं झालं नाही तुमचं. आताच ही निरवानिरवीची भाषा का?” नाना – “अहो मग काय करू? जर, मी नकोसा झालो आहे सगळ्यांना, तर मग मी जगून काय करू?” समुपदेशक – “आपण सर्वांना नकोसे झालो आहोत असं का वाटतंय तुम्हाला? नाना – “कोणालाही माझ्यासाठी वेळ नसतो. मुलगा, सून जे सकाळी जातात, ते थेट संध्याकाळी उशिरा येतात. जेवणाच्या वेळी काही बोलणं झालं, तर झालं, नाहीतर तेही नाही. नातवंड शाळेत आणि अभ्यासात गर्क असतात. आणि बायकोची तर वेगळीच त-हा. तिला घरकामातून, आणि भजनीमंडळातून माझ्यासाठी वेळच नाही. मी घरात आहे, याची, नोंद सुद्धा घेत नाहीत हे लोक. मग मी काय करू?” अशा तऱ्हेने नानांचे खरे दुखणे उघड झाले. पण वस्तुस्थिती अशी होती का? मुलगा आणि सून, नोकरीतील व्यस्ततेमुळे, दिवसभर घराबाहेर असत ही गोष्ट खरी होती. त्यांना खरेच वेळ नव्हता. पण ते नानांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होते, हे मात्र खरे नव्हते. मुलाला नोकरी लागून दहा-बारा वर्षे झाली होती. सूनही लग्नाआधी पासूनच नोकरी करत होती. पण अगोदर नाना स्वतःच नोकरीसाठी दिवसभर बाहेर असल्याने, त्यांना हे कधी जाणवलेच नव्हते. बायकोनेही तेव्हापासूनच तिच्या रिकाम्या वेळाची, भजनीमंडळ, घरकाम, वगैरे पद्धतीने, योग्य ती व्यवस्था लावली होती. नाना जेव्हा निवृत्त झाले, तेव्हा त्यांना संपूर्ण दिवस मोकळा मिळू लागला. पण बाकीच्यांचा दिनक्रम पूर्वीपासूनच ठरलेला होता. त्यात नानांसाठी वेगळा वेळ कुणीच ठेवला नव्हता. आपल्या रिकाम्या वेळात, काय करता येईल, याचा विचार नानांनी केलाच नव्हता. त्यामुळे ते रिकामपण त्यांना खायला उठत होते. ज्याअर्थी घरातील लोक आपल्याला वेळ देत नाहीत, आपली नोंद घेत नाहीत, त्याअर्थी आपली त्यांना गरज नाही, आपण त्यांना नकोसे झालो आहोत, असा सोयीस्कर अर्थ नानांच्या मनाने लावला. ही नाकारलेपणाची भावना त्यांच्या मनात घर करून बसली. अशी भावना भयंकर असते. आपल्या माणसांमध्ये आपल्याला स्वीकारले जावे, त्यांच्या आयुष्यात आपल्याला स्थान असावे, ही माणसाची मनाची मूलभूत गरज असते. ती पूर्ण न झाल्यास, मनात नाकारलेपणाची तीव्र नकारात्मक भावना निर्माण होते. हळूहळू दृढीकरण होत, या भावनेचा जेव्हा उद्रेक होतो, तेव्हा त्याची लक्षणे, उच्च रक्तदाबा सारख्या मनोकायिक आजारांच्या रूपाने व्यक्त होऊ लागतात. आता या समस्येच्या सोडवणुकीत, समुपदेशनाची भूमिका नेमकी काय? समुपदेशकाने केलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याने नानांना बोलते केले. त्यांच्या मनातील तीव्र नकारात्मक भावनेची त्सुनामी, जी दबली गेल्यामुळे, आतल्या आत धुमसुन, रक्तदाब वाढवत होती. ती बोलून, व्यक्त झाल्यामुळे, शांत झाली. मनातील नकारात्मक भावनांचा निचरा झाल्यामुळे, नानांची समस्या तिथेच निम्मी संपली. निवृत्तीनंतर, खरी समस्या होती ती नानांचा एकटेपण. नानांचं मन एकदा मोकळं झाल्यानंतर, समस्येबाबत राहिलेल्या गोष्टी तीन. १) घरातील लोकांच्या वागण्याचा, आपण लावलेला अर्थ वस्तुस्थितीला धरून नाही, याविषयी नानांच्या मनात जाणीव निर्माण करणे. २) मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून, स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी नानांना उद्युक्त करणे. ३) नातेसंबंध घट्ट टिकवण्यासाठी, आणि त्यात ओलावा टिकून राहावा, म्हणून, घरातील माणसांनी एकमेकांना काही वेळ देणे आवश्यक आहे, यासंबंधी संपूर्ण कुटुंबाच्या मनात एक जाणीव निर्माण करणे. पहिली दोन कामे, ही नानांच्या संदर्भात असल्याने, त्यांच्याशी बोलून ती पूर्ण करता आली. मात्र तिसऱ्या कामासाठी संपूर्ण कुटुंबाशी बोलणे आवश्यक होते. त्यासाठी समुपदेशकाने, कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून, सुधीरशी चर्चा केली. खरी परिस्थिती कळल्यानंतर सुधीर आश्चर्यचकितच झाला. छोट्या छोट्या गोष्टींचे, इतके गंभीर परिणाम होऊ शकतात, हे जाणल्यानंतर, सुधीरमध्येसुद्धा, नात्यासंबंधी एक प्रगल्भ जाणीव निर्माण झाली. आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या जगण्यात, आवश्यक ते बदल करण्यास, सुधीर मनापासून आणि जबाबदारीने तयार झाला. समुपदेशकाकडे येताना, शंका आणि काळजीने घेरलेले नाना, आणि सुधीर, समुपदेशनाच्या दोन सत्रांनंतर, जाताना, काळजीमुक्त आणि आनंदी होऊन गेले. ( लेखांमध्ये उल्लेख केलेला प्रसंग, खरा असून, पात्रांची नावे मात्र बदललेली आहेत.)
मना तळमळसी… 2.
“समुपदेशन “ही एक मानसशास्त्रीय उपचार पद्धती आहे हे आपण पाहिले.पण यातील मानसशास्त्रीय आणि उपचार पद्धती या शब्दांनी आतापर्यंत याविषयी फारच गैरसमज पसरवले असण्याची शक्यता आहे. उपचार म्हटले की ते आजारी माणसासाठीच असावेत असं वाटू शकतं. आणि त्यातही ते मानसशास्त्रीय असतील तर अजूनच मोठा गोंधळ. म्हणजे मानसिक दृष्ट्या जे आजारी आहेत, (आपल्या सर्वांचा आवडता शब्द – वेडा किंवा वेडी) त्यांच्याच साठीची ही भानगड असावी असं वाटू शकतं. पण हे खरं नाही. प्रत्यक्षात, व्यक्तिमत्व विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रशिक्षण तंत्रामध्ये बराचसा भर हा समुपदेशन तंत्रावरच असतो. समुपदेशकाबरोबर केलेली पाऊण तासाची चर्चा, म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची एक छोटीशी कार्यशाळाच असते. मनोविकारांवरील उपचार हे समुपदेशनाचा वापर होणाऱ्या अनेक क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे एवढेच. याविषयी आपण पुढे विस्तृत चर्चा करूच. पण तूर्त आपण समुपदेशन ही नेमकी काय भानगड आहे हे समजून घेऊ. समुपदेशनाला ‘टॉकथेरपी’ असंही म्हटलं जातं. संवादाच्या माध्यमातून समस्येची सोडवणूक असे समुपदेशनाचे स्वरूप असते. या स्वरूपाच्या आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टी, म्हणजे सल्ला आणि उपदेश. कधीतरी आपल्याला एखादा निर्णय घ्यायला अडचण येते. मग आपण अशा एखाद्या माणसाकडे जातो, की ज्याला त्या विषयातील आपल्यापेक्षा अधिक ज्ञान आहे, असं आपल्याला वाटतं. मग त्याच्याशी चर्चा केल्यावर आपल्याला, कदाचित त्यासंबंधी निर्णय घेणं सोपं होतं. आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या आयुष्यभराच्या अनुभवाचा फायदा, सल्ला, उपदेशाच्या रूपाने आपल्याला मिळतच असतो. अनेकदा असा सल्ला देण्याचं काम आपले मित्रही करत असतात. किंवा व्यवसाय, धंद्याच्या क्षेत्रात व्यावसायिक तज्ञ सुद्धा असा सल्ला देत असतात. उदा. कर सल्लागार, किंवा गुंतवणूक सल्लागार. हे जे सल्लागार असतात, ते त्या त्या विषयातील तज्ञ असतात. आपापल्या क्षेत्रात, अभ्यासाने त्यांनी तज्ञता मिळवलेली असते. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे स्वरूप नेमके कसे असते.? तर आपल्या समस्येवर सुचवलेले एक तयार उत्तर असे ते असते. म्हणजे कसे.? उदा. आपल्याला आपल्या बचतीच्या पैशांची गुंतवणूक करायची आहे. म्हणून आपण गुंतवणूक सल्लागाराकडे जातो. मग तो आपल्याला माहिती विचारतो. एकदा त्याला हवी असलेली माहिती त्याला दिली, की तो बाजारात उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी, आपल्या गरजेप्रमाणे त्याला योग्य वाटणारा पर्याय सुचवतो. म्हणजे काय, तर आपल्या समस्येवरील अगदी तयार, रेडीमेड उत्तर तो देतो. आता थोडंसं उपदेशाबद्दल. उपदेश हा शब्द बराचसा अध्यात्मिक परंपरेतून आलेला आहे. त्याच्या अर्थामध्ये काहीशी आदेशात्मकतेची छटा आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती त्यांच्या शिष्यवर्गाला उपदेश देतात. उपदेश देणाऱ्याच्या अध्यात्मिक थोरवीची, आणि अधिकाराची प्रभावळ या उपदेशा भोवती असते. आणि त्या उपदेशाप्रमाणे न वागण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या तुलनेत समुपदेशन ही एक वेगळीच संकल्पना आहे. समुपदेशनात कधीच थेट सल्ला किंवा आदेश दिला जात नाही. मग समुपदेशन नेमकं कसं असतं.? आपण पाहूया.. एखादा माणूस, एखाद्या प्रसंगात, एका विशिष्ट प्रकारे वागतो. त्याची वागण्याची पद्धत ही खास त्याची अशी ‘व्यक्तीविशिष्ट’ असते. ही पद्धत कशी ठरते? तर त्या प्रसंगाचं, त्या माणसाला, जसं आकलन होतं, त्यावर ही पद्धत ठरते. त्या माणसाला, त्या प्रसंगाचं होणारं आकलन, हे त्याच्या मानसिक सवयींवर अवलंबून असतं. मानसिक सवयी या पूर्वानुभवावर आधारित असतात. सोप्या भाषेत बोलायचं झालं, तर त्या प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा असेल, तसं त्याचं आकलन असतं. हा दृष्टिकोनसुद्धा आपल्या मानसिक सवयींचं फलित असू शकत. दृष्टिकोन हा शब्द, अर्थाच्या दृष्टीने अगदीच ढोबळ आहे. मानसशास्त्रात या अर्थाने अभिवृत्ती हा शब्द वापरला जातो. थोडक्यात काय, तर माणसाच्या वागण्याच्या मुळाशी, त्याचा त्या प्रसंगाबद्दलचा दृष्टिकोन असतो. सहाजिकच, जेव्हा दृष्टिकोन सदोष असतो, तेव्हा आकलन सुद्धा सदोषच असणार. सदोष आकलनापोटी होणारं वर्तन सुद्धा, काहीसं विचलित असणार यात काय शंका.? या सगळ्याचा अर्थ असा निघतो की, जर वर्तनातील दोष दूर करायचे असतील, तर त्याच्या मुळाशी असणाऱ्या सदोष दृष्टीकोनांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आणि समुपदेशकाची भूमिका नेमकी इथेच सुरू होते. सदोष वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या सदोष दृष्टिकोनातील दोष, दूर करून, ते सामान्य पातळीवर आणणे हेच तर समुपदेशकाचे काम असते. त्यासाठी समुपदेशक जी “संवाद तंत्रे” (communication techniques)वापरतो, ती फार महत्त्वाची असतात. समूपदेशकाकडे आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, तो कधीही, “तुमचं हे असं चुकतं आहे. त्यात अशी अशी सुधारणा करा” असा थेट सल्ला देत नाही. कारण ते काहीच उपयोगाचं नसतं. उच्च रक्तदाबाच्या पेशंटला डॉक्टर नेहमी सांगतात की, “आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. कशाचा जास्त विचार करू नका.” त्याला घरातील मंडळी सुद्धा सांगतात की “फार मनाला लावून घेऊ नये, सोडून द्याव्यात लहान लहान गोष्टी.” पण त्याची अडचणी अशीअसते की, त्याला बिचाऱ्याला ‘हे करायचं कसं?’ हे माहीतच नसतं. कधी ना कधी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असतोच. हे घडण्यासाठी, त्या विशिष्ट दृष्टिकोनामधील दोषाबद्दल, त्या व्यक्तीच्या मनात एक जाणीव निर्माण व्हावी लागते. तशी जाणीव निर्माण झाल्यावर, वर्तमानातील बदलासाठी, वेगळे प्रयत्न करावेच लागत नाहीत. ते आपोआपच होतात. ही आवश्यक असलेली जाणीव निर्माण करण्याचं काम समुपदेशकाचं असतं. माणसाच्या शारीरिक वाढीनुसार, त्याच्या मानसिक विकासाच्या प्रक्रियेतील टप्पे, त्यातील धोक्याची वळणे, आणि त्यातील खाचाखळगे, हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. आणि, व्यक्तीशी संवाद साधून, त्याच्या समस्या नेमकेपणाने समजून घेऊन, त्याच्यामध्ये स्वतःविषयी आणि स्वतःच्या जगण्याविषयी, एक प्रगल्भ जाणीव निर्माण करणे, हा संज्ञापनशास्त्राच्या (communication science)अभ्यासाचा प्रांत आहे. समुपदेशकाला या दोन्ही गोष्टींची उत्तम जाण असावी लागते, सूक्ष्म अशा संज्ञापन तंत्रांचा, म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं तर, संवादतंत्रांचा वापर करून, प्रशिक्षित समुपदेशक, आपले उद्दिष्ट साध्य करीत असतो.
मना तळमळसी…लेखांक ०१.
आजच्या जगण्यातील आव्हाने, त्यामुळे अनुभवास येणारे असमाधान, अस्वस्थता, आणि आपल्या मनाची होणारी अगतिक अवस्था हे सगळं आपण अनुभवतो आहोत. यासाठी आपल्याला मदत करु शकणारा एक परिणामकारक उपाय म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन. आपल्या जगण्यातील विविध अडचणी आणि त्यासाठी समुपदेशनाची होणारी मदत यांचा परिचय करुन देणारी ही लेखमाला सुरु करीत आहे. आपला प्रतिसाद मला हुरुप देणारा असेल. मना तळमळसी …! लेखांक १. आधुनिक काळातील माणसाचं जगणं पूर्वी कधी नव्हे एवढं बदललं आहे. आजच्या पिढीचं जगणं आणि आपल्या अगोदरच्या पिढीचं जगणं यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. कॉम्प्युटरच्या एका क्लिकच्या मदतीने इथे भारतात बसलेले आजोबा आपल्या अमेरिकेतल्या नातवाशी सहज गप्पा मारू शकतात. तंत्रज्ञानातील या बदलांचा वेगही अगदी झपाटून टाकणारा आहे. इतका की काल आलेलं तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरत आहे. पूर्वीच्या शेकडो वर्षांच्या अस्थिर जगण्याने संस्कृती म्हणून स्थापित झालेले माणसाच्या जगण्याचे सारे संकेत आज कालबाह्य ठरावेत अशी परिस्थिती निर्माण होते आहे. बदल, वेग, आणि स्पर्धा हे आजच्या युगाचे परवलीचे शब्द बनले आहेत. बदल, वेग, आणि स्पर्धेमुळे बाहेरच्या जगाबरोबर माणसाचं भावविश्व सुद्धा कधी नव्हे इतके ढवळून निघालं आहे. त्यामुळे मानसिक, भावनिक, समस्यांचं किंवा त्याहूनही गंभीर अशा मनोविकारांचे आणि मनोकायिक आजारांचे प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसतं. पाव शतकापूर्वी उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे मनोकायिक आजार; हे क्वचित आढळणारे श्रीमंती आजार होते. पण आज पस्तिशीच्या पुढच्या पिढीत सुद्धा हे आजार सहजरीत्या आढळतात. आधुनिक मानसशास्त्राने माणसाच्या जगण्यातील या बदलांची, समस्यांची दखल घेऊन त्यांचा अगदी सूक्ष्मतेने अभ्यास केला. त्या सोडवण्यासाठी अनेक उपचार पद्धती शोधून काढल्या. त्यातलीच एक प्रभावी उपचारपद्धती म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन (सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग). या लेखमालेतून आपण याच उपचारपद्धतीची अधिक विस्तृत ओळख करुन घेऊ. आपण वापरतो ती सर्व वाहने जरी स्वयंचलित असली, तरी ती चालवण्यासाठी चालकाची म्हणजे ड्रायव्हरची आवश्यकता असते. अगदी त्याच प्रकारे आपल्याला ही आयुष्यभर आपलं मन चालवत असतं. गंमत म्हणजे आपल्याला हवं तिथं ते आपल्याला नेईलच याची अजिबात खात्री नसते. त्याला मध्येच कुठेतरी; बरेचदा नको तिथं, गुंतून पडण्याची सवय असते. या प्रवासात लहान-मोठे अपघात तर रोजचेच. म्हणजे आपण ठरवतो एक, आणि आपलं मन आपल्या हातून वेगळीच गोष्ट घडवतं. आठवण्याचा प्रयत्न करून पहा. कितीतरी वेळा आपल्याला असं वाटतं की आपण असे कसे वागलो..? काहीतरी होतं, कोणीतरी काहीतरी म्हणतं; आणि अगदी अचानक आपण अतिशय स्फोटक रीतीने रिअॕक्ट होतो. आपल्या या रिएक्शनचे परिणाम पुढे बरेचदा फारच वाईट होतात. नंतर आपल्याला असं वाटत राहतं, की आपण असे कसे वागलो? आपल्याला नेमकं काय झालं होतं? किंवा बरेचदा एखादा विचार प्रसंग आपला पिच्छा सोडत नाही. आपल्याला खरं तर तो झटकायचा असतो. पण नाही. सोडतच नाही तो आपल्याला. मग आपल्या वागण्यावर, कामावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. कौरव-पांडवांच्या दोन सेनासागरांमध्ये निराश होऊन, हातपाय गाळून बसलेल्या अर्जुना सारखीच आपली अवस्था होते अगदी. आपलं मन आपल्यावर कशी हुकुमत गाजवतं, अन् त्याची वागण्याची पद्धत नेमकी कशी असते, हे समजण्यासाठी आपल्याला मुळातूनच मन ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आणि हीच तर सर्वात अवघड कामगिरी आहे. मन समजून घेण्यासाठी तर माणूस हजारो वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील काही थोर मंडळींना ते उमगले सुद्धा. पण ज्यांना ते उमगलं त्यांच्या हेही लक्षात आलं की हा अगदीच वैयक्तिक आणि व्यक्तिगत अनुभव आहे. इतका, की तो इतरांच्या जाणिवेला आणताच येत नाही. म्हणजे मग तुमच्या माझ्यासारख्या पामराची अवस्था, स्वतःचच शेपूट पकडून पाहणाऱ्या कुत्र्यासारखी होते अगदी. आपण मनाच्या मागे, आणि तो पठ्ठ्या आपला पुढेच. याच्यावर उपाय सापडला तो आधुनिक मानसशास्त्राला. मनाचा अभ्यास करू पाहणार्या मानसशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं, की ज्याचा अभ्यास करायचा, ते मन, आपल्याला निरीक्षणासाठी उपलब्धच नाही मुळी. मग काय करायचं तर त्यांच्या लक्षात आलं, की मन हे माणसाच्या वर्तनाचं कारक आहे. म्हणजे मन सांगतं आणि माणूस त्याप्रमाणे वागतो. हा संबंध लक्षात आल्यानंतर मग मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र राहिलंच नाही. तर ते झालं मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आपलं वागणं आणि त्यामागची मूळ गुंतागुंत समजून घेण्यासाठी, आपल्याला मानसशास्त्राचीच मदत घेणे गरजेचे आहे. मानसशास्त्राला हे समजलं की *माणसाचं मन म्हणजे जन्मापासून त्याला आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातून त्याला झालेल्या ज्ञानाची आणि त्याच्या एकूण मानसिक सवयींची गोळाबेरीज. यातली गम्मत अशी की असं अनुभवातून मिळालेले ज्ञान, म्हणजे त्या अनुभवांचा त्याने लावलेला अन्वयार्थ. आणि हा अन्वयार्थ लावण्यासाठी साधन म्हणून काम करतं, ते अशाच प्रकारे त्यापूर्वी मिळालेले पूर्वसंचित ज्ञान. म्हणून तर एकाच घटनेत सहभागी असणाऱ्या दोन माणसांना तीच एकच घटना वेगवेगळ्या प्रकार हे समजते. त्या एकाच घटनेचा त्या दोघांनी लावलेला अन्वयार्थ वेगवेगळा असू शकतो. अनेक कारणांनी माणसाच्या मनात आपल्या आसपासच्या जगाच्या होणाऱ्या आकलनात गोंधळ होऊ लागतो. तेव्हा मग त्या माणसाच्या आकलनातील गडबड त्याच्या वागण्यात प्रगट होऊ लागते. अशा विचालित वर्तनाला मानसशास्त्राच्या भाषेत म्हणतात वर्तनसमस्या. वर्तनसमस्यांना कारणीभूत असणाऱ्या मनोवस्थेला मानसशास्त्रात मनोविकार असं म्हटलं जातं. आधुनिक मानसशास्त्राने अशा अनेक साध्या, आणि गंभीर मनोविकारांचा अधिक अगदी सूक्ष्मतेने अभ्यास केला. आणि त्यांचे दोन प्रमुख गट पाडले. पहिला गट म्हणजे सायकोसिस. या गटातील वर्तन समस्या या प्रामुख्याने वैद्यकशास्त्राच्या कक्षेत येणाऱ्या असतात. यांच्या उपचारांसाठी औषधोपचारांची गरज असते. यामध्ये छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया), किंवा उन्माद, असे अतिगंभीर आजार येतात. दुसरा गट आहे तुमच्या माझ्यासारख्या संपूर्ण शहाण्या आणि अजिबात आजारी नसणाऱ्या सामान्य माणसांना सतावणा-या छोट्या-मोठ्या मानसिक, भावनिक अडचणी किंवा समस्या. उदाहरणार्थ भीती, चिंता, नैराश्य. वैद्यकीयदृष्ट्या या लोकांना आजारी, म्हणजे मनोरुग्ण असं म्हणता येत नाही. या समस्या अगदी छोट्या छोट्या असतात. पण कधी कधी त्यांचा आपल्या जगण्यावर होणारा परिणाम हा अतिशय गंभीर असू शकतो. त्यामुळे आपल्या जगण्यामध्ये अतिशय गंभीर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशा अगदी नॉर्मल माणसांच्या छोटया आणि गंभीर वर्तनसमस्या सोडवण्यासाठी अतिशय प्रभावीपणे उपयोगी पडणारी उपचार पद्धती, म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन. गंभीर अशा मनोविकारांमध्ये उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया ही उपयोगी नसते. ज्या व्यक्तींशी संवाद साधणं शक्य आहे अशाच व्यक्तींना ही उपचार पद्धती उपयोगी पडते. गंभीर मनोविकारांमध्ये हा संवाद शक्य नसतो. आधुनिक जगण्यातील ताणतणाव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वर्तन समस्यांना सामोरे जाण्यासाठी फारच प्रभावीपणे या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. अशा अनेक मानसिक समस्या आणि त्या सोडवण्यातील मानसशास्त्रीय समुपदेशनाची भूमिका आणि उपयोग, हाच या लेखमालेचा विषय आहे. मानसशास्त्रीय समुपदेशन ही आधुनिक काळातील मानसिक आरोग्याची आणि समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे. समुपदेशन आपल्या आयुष्यात कोणकोणत्या क्षेत्रात कसे उपयोगी पडू शकते याची आपण या लेखमालेमध्ये चर्चा करू. — विवेक दसरे. मानसतज्ञ. अहमदनगर