व्यक्तिगत कौन्सिलिंग/ समुपदेशन –
माणसाला जगताना, भावनांचे व्यवस्थापन आणि व्यक्तिगत समायोजन याविषयीच्या अनेक समस्या येत असतात. उदा. अति राग, सातत्याने येणारे नकारात्मक विचार, विनाकारण होणारी चिडचिड, विनाकारण वाटणारी भीती, इतर ताणतणाव, निर्णय कौशल्यांचा अभाव, आणि याच्या पुढील अधिक गंभीर भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य, चिंतावस्था, मंत्रचळ (Obsessive compulsive disorder), भयगंड, इत्यादी. या सर्व समस्या सोडवण्यासाठी कौन्सिलिंग ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे.
जोडप्यांसाठी (पती-पत्नी) समुपदेशन –
नवीन लग्न झालेली अशी अनेक जोडपे असतात की, ज्यांचं एकमेकांशी पटत नाही. त्यांचं स्वभाव, त्यांचे जीवनविषयक भिन्न दृष्टिकोन, आणि त्यांचे टोकदार अहंकार, या कारणांमुळे त्यांच्यामध्ये सातत्याने मतभेद आणि भांडण होत असतात. ही जोडपी एकमेकांना समजावून घेण्यात कमी पडतात. अशावेळी कौन्सिलिंग ही एक अतिशय प्रभावी उपाय असू शकतो, ज्याच्या सहाय्याने ही जोडपी स्वतःला आणि एकमेकांना समजून घेऊ शकतात. त्याचबरोबर प्रेम म्हणजे काय, नातं म्हणजे काय, हेही त्यांना कौन्सिलिंगच्या मदतीने समजावून घेता येतं. अशा जोडप्यांच्या बाबतीमध्ये, “एकमेकांबरोबर समाधानाने आणि आनंदाने जगणं” म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक असतं. काउंसिलिंगच्या मदतीने त्यांना एकमेकांतील प्रेमाचा बंध सशक्त करणे, आणि त्यांचं नातं चांगलं करणं जमू शकतं. या सर्वांसाठी कौन्सिलिंग ही एक प्रभावी पद्धत करू शकते.
समूहासाठी समुपदेशन –
मानसिक आरोग्य विषयक जाणीव आणि जागृती निर्माण करणे, तसेच दैनंदिन आयुष्यात अडचणी निर्माण करणाऱ्या अनेक वर्तनसमस्या आणि सवयी, यासाठी सामूहिक समुपदेशन ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. उदा. मोबाईल आणि स्क्रीनचे व्यसन, विचार करण्याच्या सवयी, चांगल्या आणि वाईट वर्तनसवयी, नातेसंबंधांची जोपासना इत्यादी. सामूहिकरित्या वरील गोष्टींबद्दल जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी समूह समुपदेशन ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन –
वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या, शाळा, शिक्षण, आणि अभ्यास या संदर्भात अनेक अडचणी असतात. एकाग्रतेचा अभाव, अभ्यासात लक्ष न लागणे, अभ्यासाचे तंत्र, सामाजिक कौशल्यांचा अभाव, पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांच्या आणि नातेसंबंधांच्या समस्या, बंडखोर उद्धट वर्तन, लैंगिक शिक्षण, परीक्षेची काळजी, ही त्यातील काही ठळक उदाहरणे आहेत. समुपदेशन ही अशा प्रकारच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी अतिशय प्रभावी पद्धत ठरू शकते.
विवाहपूर्व समुपदेशन –
विवाह ही माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक घटना असते. विवाहमुळे माणसाच्या जगण्याला एक निश्चित वळण मिळत असते. या संदर्भात जोडीदाराची निवड, लग्नामुळे निर्माण होणाऱ्या जबाबदारीची जाणीव, एक उबदार आणि आनंदी असं नातं निर्माण करणे, आणि जोडीदाराला आधार देऊन, बरोबर घेऊन, समाधानाने वैवाहिक आयुष्य जगणे, या संदर्भात अनेक अडचणी आणि समज गैरसमज आहेत. विवाहोत्तर लैंगिक संबंधाबद्दलचे अनेक गैरसमज आणि अज्ञान हा सुद्धा वैवाहिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या संदर्भात निर्माण होणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन हा एक अतिशय प्रभावी उपाय ठरू शकतो.
पालकत्वाच्या समस्यांसाठी समुपदेशन –
आधुनिक काळात एकत्र कुटुंब पद्धती मोडीत निघाली आहे. सध्याच्या काळामध्ये छोट्या आणि विभक्त कुटुंबांचा काळ आहे. छोट्या कुटुंबांचे स्वतःचे फायदे देखील आहेत. पण त्याचबरोबर छोट्या कुटुंबांचे अनेक तोटे देखील आहेत. विभक्त कुटुंबात, मुलांना वाढवणे ही एक अतिशय ऐरणीवरील समस्या आहे. नव्याने आई-वडील झालेल्या जोडप्याला मुलं वाढवण्याचा काहीही अनुभव नसतो. आणि या संदर्भातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शनही उपलब्ध नसते. त्यासाठी मुलांचे पालनपोषण करताना, लहान मुलांची मानसिकता, त्यांच्या वर्तनाच्या पद्धती, आणि त्यात येणाऱ्या अडचणी, यासाठी ‘पालकत्व समुपदेशन’ ही एक अतिशय प्रभावी मदत ठरते.
अनेक प्रकारच्या व्यसनांसाठी समुपदेशन उपचार –
सध्याच्या आधुनिक आणि शहरी जीवनात दारू, आणि इतर अनेक ड्रग्जची व्यसने ही एक अतिशय भयंकर समस्या झालेली आहे. एवढेच नव्हे, तर आधुनिक काळात, तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे काही आधुनिक व्यसने सुद्धा निर्माण झाली आहेत. उदा. मोबाईलचे, स्क्रीनचे व्यसन, समाज माध्यमांचे व्यसन, गेमिंगचे व्यसन. समुपदेशन ही अशा प्रकारच्या व्यसनांपासून व्यसनमुक्तीसाठी एकमेव उपचार आहे.
आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी, आणि व्यावसायिक यांच्यासाठी अनेक विषयांवरचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो. या प्रशिक्षण कार्यक्रमांचे विषय मानसिक आरोग्य(mental health), ‘स्व’ जाणीव (self awareness)आणि सामाजिक कौशल्य विकास(social skill development), हे असतात. प्रशिक्षणार्थींना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाविषयी एक व्यापक जाणीव निर्माण करणे, आणि मानसिक आरोग्य विषयक जाणीव निर्माण करणे ही उद्दिष्टे या प्रशिक्षण कार्यक्रमांची असतात. या प्रशिक्षणात सहभागी होऊन प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक कौशल्य अर्जित करतात. उदा. सुद्धा पण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स), निर्णय क्षमता (decision making)तणाव व्यवस्थापन.
आधुनिक काळामध्ये अनेक क्षेत्रातील विविध प्रकारचे करिअर पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर चे नियोजन करताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे, आणि आपला नैसर्गिक कल यांचे योग्य ज्ञान आणि जाणीव नसते. त्यामुळे करिअरसाठी योग्य पर्याय निवडणे खूप जिकिरीचे झाले आहे. आम्हाला पालकांची याविषयीची काळजी समजते. त्यामुळेच आम्ही एक व्यापक असा करिअर प्रशिक्षण पॅकेज उपलब्ध करून दिला आहे. एका अतिशय शास्त्रशुद्ध अश्या मानसशास्त्रीय कलचाचणीचा या पॅकेज मध्ये समावेश आहे. या कल चाचणीद्वारे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा नैसर्गिक कल, त्यांच्यातील कौशल्ये, आणि त्यांच्या क्षमता, या सर्व घटकांचे मानसशास्त्रीय मूल्यमापन होते. या कलचाचणीच्या रिपोर्टच्या आधारे एक समुपदेशन सत्र सुद्धा या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. कलचाचणीतील मानसशास्त्रीय मूल्यमापनाच्या आधारे या रिपोर्टमध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला योग्य ठरतील, अशा क्षेत्रातील करियर संधींची यादीही सुचवलेली असते. कल चाचणीचा रिपोर्ट, आणि समुपदेशन सत्रामध्ये या रिपोर्ट च्या आधारावर केले जाणारे मार्गदर्शन, याच्या साह्याने विद्यार्थ्यांना स्वतःच्या करिअरचे नियोजन करणे खूप सोपे होते. आणि निवड चुकण्याची शक्यता खूप कमी होते.
व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील यश, समाधान, आणि आनंद, या सर्व गोष्टी व्यक्तीच्या परिपक्व, आणि विकसित अशा व्यक्तिमत्त्वाच्या पायावर आधारित असतात. विद्यार्थ्यांना आपले करिअर, आणि व्यक्तिगत आयुष्य, अशा भक्कम पायावर उभारता यावे म्हणून, आम्ही एक व्यापक असा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम तयार केला आहे. जो खास करून महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तयार केला गेला आहे. या कोर्समध्ये, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण कसे करायचे, याचे आणि विविध अशा आवश्यक त्या सामाजिक कौशल्यांचे प्रशिक्षण, या गोष्टींचा समावेश आहे. कम्युनिकेशन कौशल्ये, वेळचे व्यवस्थापन, तणाव व्यवस्थापन, भावनांचे व्यवस्थापन, विचार कौशल्ये, इत्यादी अनेक सामाजिक कौशल्यांचे प्रशिक्षण या मध्ये समाविष्ट आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना नवीन नातेसंबंध जोडणे, आणि त्यांची जोपासना करणे, स्वतःच्या कल्पना आणि भावना प्रभावी पद्धतीने व्यक्त करणे, आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाचा प्रभावीपणा वृद्धिंगत करणे, या गोष्टी सहज शक्य होतात.