मना तळमळसी 4.

संवादाचे पूल टिकवा..!      मूल ज्या वातावरणात वाढत असतं, त्या वातावरणाचा- (नेमका शास्त्रीय शब्द वापरला तर, परिवेश- Environment) -मुलांच्या जडणघडणीवर अतिशय सखोल परिणाम होत असतो. आई – बाबा, आजी – आजोबा, भावंडे, मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शेजारी हे सर्व या वातावरणाचे घटक असतात. मुलांच्या वाढीच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, आई-बाबांचा मुलांशी असणारा संवाद. हा संवाद जर निर्माण करून, टिकवता आला, तर मुलांच्या भावविश्वात, जेव्हा त्यांना अडचणी निर्माण होतात, तेव्हा ते आई-बाबांचा आधार घेतात. पण हे संवादाचे पूल तुटले, तर मूल अगदी एकटे पडू शकते. पौगंडावस्थेत आणि अगदी कॉलेजच्या वयात सुद्धा हा संवाद अतिशय महत्त्वाचा असतो. तो टिकवण्यासाठी पालकांना, आपल्या वागण्यातून आपली विश्वासार्हता निर्माण करावी लागते. या संवादा अभावी तेवढा अनर्थ होऊ शकतो, आपण पाहूया…      19 – 20 वर्षाच्या जयंतला घेऊन, त्याचे आई आणि बाबा असे तिघेजण समुपदेशनासाठी आले. साधारण 19/ 20 वर्षाचा जयंत हॉटेल मॅनेजमेंट शिकत होता. बारावीपर्यंतचे त्याच्या शैक्षणिक रेकॉर्ड अगदी व्यवस्थित होते. कधीही ८० टक्क्यांच्या च्या खाली आला नाही. ही सर्व माहिती जयंतची आई उत्साहाने सांगत होती. जयंताने दहावीनंतर शास्त्र शाखेकडे जावे, हा त्याच्या वडिलांचा निर्णय होता. आई-बाबा दोघेही, जयंतबद्दल तक्रारीच्या स्वरात बोलत होते. आई जास्तच बोलत होती. संपूर्ण वेळात, दोघांच्याही बोलण्यात, एक मुद्दा पुन्हा पुन्हा येत होता. तो म्हणजे जयंतच्या शिक्षणासाठी केलेल्या खर्चाबद्दल. म्हणजे कसे महागडे क्लास लावले, महागड्या कॉलेजला घातलं, वगैरे गोष्टी जोर देऊन सांगत होते. आपल्या आर्थिक कुवतीच्या पुढे जाऊन आपण हा खर्च केला असं ते म्हणत होते.      गेल्या दोन महिन्यात, जयंताच्या स्वभावात, आणि वागण्यात झालेला बदल, ही त्यांची समस्या होती. तो अचानक अबोल आणि एकलकोंडा झाला होता. घरात कोणाशीच बोलत नव्हता. बाहेरून आला की, स्वतःला खोलीत कोंडून घेई. मग त्याच्या कॉलेजमधून अचानक पत्र आले, की गेले कित्येक दिवस तो कॉलेजला गेलेलाच नाही. हा मात्र आई-बाबांसाठी जणू शॉकच होता. या मुद्द्यावर दोघांनी त्याच्याशी सर्व पद्धतीने बोलून पाहिले. पण तो काहीच प्रतिसाद देईना. फक्त उद्यापासून कॉलेजला जाईन, असे म्हणत असे. आणि प्रत्यक्षात जातच नसे. घरातून निघे, आणि कुठेतरी वेळ घालून परत येई.      आई-बाबा हे सर्व सांगत असतानासुद्धा, जयंत अगदी केविलवाणे तोंड करून, खाली मान घालून बसला होता. मग समुपदेशक, आणि आई-वडिलांना बाहेर बसवून, फक्त जयंतशी संवाद साधला. त्याला बोलतं करण्यासाठी सुद्धा बरेच परिश्रम घ्यावे लागले. जरा विश्वास वाटल्यानंतर तो बोलू लागला. इतके दिवस मनात साठवलेली, ठासून भरलेली भावनांची वाफ, जणू मोकळी झाली. त्याच्या मनावर इतका प्रचंड ताण होता, की बोलण्याची सुरुवात होताना त्याला भावना वेग आवरताच आला नाही. पहिली दोन मिनिटं तो तरुण मुलगा नुसता ढसाढसा रडला. हे चांगलं लक्षण होतं. समुपदेशकाने त्याला रडू दिले. त्याचा आवेग कमी झाल्यावर, मग पुन्हा एकदा अश्वस्त करून, बोलण्यास प्रवृत्त केले. मग जयंत सांगू लागला.      आपल्या मुलाने काहीतरी वेगळे करावे, सरधोपट मार्गाने जाऊ नये, असे त्याच्या बाबांना वाटत होते. म्हणून मग बारावीला चांगले मार्क मिळूनही, त्यांनी इंजिनिअरिंगचा विचार न करता, त्याला हॉटेल मॅनेजमेंटला घातले. जयंतची आवड अर्थातच विचारलीच नाही. हॉटेल मॅनेजमेंटची फी अर्थातच प्रचंड होती. ती त्यांनी भरली. जयंतच्या आई-बाबांना, केलेल्या गोष्टी सतत बोलून दाखवण्याची सवय होती. आम्ही तुझ्यासाठी, आमच्या कुवतीच्या बाहेर जाऊन, किती मोठा खर्च केला आहे, हे जयंतला आणि इतरांना सारखे ते सांगत राहिले. मग कॉलेज सुरू झालं. जोपर्यंत थेअरी चालू होती, तोपर्यंत काही अडचण आली नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष किचनमध्ये, प्रात्यक्षिके सुरू झाली, तेव्हा खऱ्या अडचणींना सुरुवात झाली. तिथे भारतीय शाकाहारी पदार्थांबरोबरच, भारतीय, आणि परदेशी मांसाहारी पदार्थ सुद्धा शिकावे लागत होते. त्यासाठी मग मांस, आणि मासे यांचे हवे तसे तुकडे करणे, ते हाताळणे, वगैरे गोष्टी सुद्धा कराव्या लागत होत्या. आणि इथेच प्रॉब्लेम सुरू झाला. अत्यंत कर्मठ शाकाहारी ब्राह्मण कुटुंबात जयंत वाढला होता. लहानपणापासूनच मांसाहार म्हणजे ‘पाप’ हे समीकरण त्याच्या डोक्यात अगदी फिट्ट बसले होते. त्यामुळे त्याला ते सर्व हाताळताना, प्रचंड किळस येत होती. आणि दुसरं म्हणजे, आपण पाप करीत आहोत, या कल्पनेने तो ती गोष्ट अजिबातच स्वीकारू शकत नव्हता.      दुसरी समस्या अशी होती की, ही गोष्ट घरात बोलायची त्याची हिंमत होत नव्हती. कारण भरलेल्या पैशांबद्दल, बाबांनी आणि आईने, इतके वेळेस त्याला सांगितले होते, की आपण हा कोर्स सोडतो, असं म्हटल्यास, त्यांचे पैसे वाया जातील. आणि त्याला आपण जबाबदार असू, या विचाराचे प्रचंड दडपण त्याच्यावर आले होते. कॉलेजमध्ये जाऊन शिकणं तर शक्य होतच नाही. आई-वडिलांच्या धाकापोटी ते सोडताही येत नाही. आणि ते मोकळेपणाने सांगता येत नाही. अशा तिहेरी दडपणाने, त्याच्या मनाची  अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती.      हे सर्व समुपदेशकाला सांगितल्यानंतर, जयंतला अगदी हलके वाटू लागले. मग राहिला प्रश्न तो हा, की ही समस्या सोडवायची कशी?  समुपदेशकाने, आई-बाबांना ही गोष्ट सांगितल्याशिवाय ही समस्या सोडवता येणार नाही, ही गोष्ट त्याच्या गळी उतरवली. आई-बाबांशी बोलून, त्यांना चर्चेसाठी तयार करायचं आश्वासन दिल्यानंतर, जयंत या गोष्टीला तयार झाला. जयंतला बाहेर बसवून मग समुपदेशकाने आई-वडिलांशी संवाद साधला. अजाणतेपणी, त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या मुलाच्या मनावर कसा ताण येत आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यावर, ते दोघेही हादरले. मुलावर त्यांचं प्रेम होतंच. ते त्याच्या हिताचाच विचार करत होते. पण अजाणतेपणी बोललेल्या काही गोष्टींमधून काय परिणाम होऊ शकतो, याची त्यांना जाण नव्हती. मुलाची आवड आपण लक्षात घेतली नाही, हेही त्यांच्या लक्षात आले. मग मोकळ्या मनाने ते मुलांशी बोलण्यास तयार झाले.       मग समुपदेशकाने समोरासमोर बसवून त्यांच्यात चर्चा घडवून आणली. मुलाची अडचण त्याच्याच तोंडून ऐकल्यानंतर, आई आणि बाबा दोघेही हादरले. मुलाच्या मनाला झालेल्या यातना ऐकून, आई तर रडूच लागली. बाबाही अगदी हळुवार झाले. आपण आपल्या मुलाला समजून घेण्यात कमी पडलो, याची त्या दोघांनाही जाणीव झाली. पैसे वाया गेले तरी चालतील, आम्हाला पैशापेक्षा तू महत्त्वाचा आहेस. तुझ्या मनाविरुद्ध तू काहीही करू नकोस. आम्ही सतत तुझ्या पाठीशी आहोत. हा विश्वास त्यांनी जयंतला दिला. आणि समस्या संपली. आता जयंत, कम्प्युटर क्षेत्रात, एथिकल हॅकिंग मधील, एक नामावंत तज्ञ म्हणून यशस्वीरित्या काम करत आहे.      मुलांना वाढवताना त्यांच्याशी असणारे संवादाचे पूल कायम राहतील याची सर्व आई-बाबांनी काळजी घ्यायची असते. संवाद नसेल, तर त्याचे परिणाम अगदी गंभीर होऊ शकतात. हे नक्की…!  (लेखात चर्चा केलेला प्रसंग खर आहे पण नावे बदलली आहेत.)